मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषद सभापतिपदासाठी प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे. या पदासाठी भाजप आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यावर दावा केला जात आहे.
विधान परिषद सभापतिपदाची निवडणूक रखडली आहे. विधान परिषदेचे सभापतिपद रामराजे यांना देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते; परंतु आता भाजपनेच या पदावर दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थतता आहे. सभापती निवडीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून नंतर निर्णय घ्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मूळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून अद्याप मान्यता मिळाली नाही. माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना अपात्र ठरविण्यासाठीची याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे भाजपने ही संधी साधली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, असे वक्तव्य केले होते. महायुतीतील ११ घटक पक्षांची त्यासाठी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असे बावनकुळे म्हणाले होते. विधान परिषद सभापतिपदासाठी नावे द्या, आम्ही बिनविरोध करतो, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी म्हटले होते. त्यानंतर या पदाबाबत चर्चा सुरु झाली आहे.