नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात वेगवेगळया भागात झालेल्या घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात तीन भरदिवसा झालेल्या घरफोडींचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना अमृतधाम भागात घडली. अरविंद गोविंद आहिरे (रा.जानकी वल्लभ सोसा.आयोध्यानगरी अमृतधाम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहिरे कुटुंबिय रविवारी (दि.३०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा आहिरे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तसेच सेटअप बॉक्स असा सुमारे ७ लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.
दुसरी घटना मायको सर्कल भागात घडली. साधू वासवानी रोड भागात राहणारे दिलीप सोमनाथ हिंगमिरे (रा.कोमल रेसि.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिंगमिरे कुटूंबिय २० ते ३० जून दरम्यान मुंबई येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे गॅलेरीतील दरवाजाची काच फोडून ही घरफोडी केली. खिडकीतून हात टाकून दरवाजा उघडणा-या चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात असलेली ३० हजाराची रोकड,सोन्याचांदीचे दागिणे व देवघरातील मुत्या चांदीची समई असा सुमारे १ लाख १ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार उबाळे करीत आहेत.
तर चेहडी भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. राहूल दत्तात्रेय ढेरिंगे (रा.गुरू आशिष अपा.महादेवनगर,चेहडी पंपीग रोड) यांनी फिर्याद दिली आहे. ढेरिंगे कुटूंबिय सोमवारी (दि.१) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तर याच वेळी परिसरातील राकेश परशराम घोलप (रा.साई दर्शन अपा.चेहडी नाका,पुनारोड) यांचेही चोरट्यांनी घर फोडले. या घरफोडीत कपाटातील सोन्याचांदीचे दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.
……..