इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील फुलरई या गावात भोलेबाबाच्या सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत १०० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना सार्वजनिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेतील गंभीर भाविकांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेत मयताचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेत काही जण पायाखाली आले तर काही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत १०० हून अधिक मृत्यू झाले असून त्यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. या सत्संगासाठी ५० हजाराच्या आसपास भाविक आल्याचे बोलले जात आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने गोंधळ उडाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहे. २४ तासात चौकशी अहवाल मागवला आहे.