नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशांतर्गत कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 29 जून 2024 पर्यंत 44.46 मेट्रिक टन इतका कोळशाचा साठा आहे, जो सध्याच्या वापराच्या मर्यादेनुसार 18.5 दिवसांची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे असे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील कोळशाच्या साठ्याची स्थिती पाहता त्या तुलनेत, सध्याचा साठा 33 टक्क्यांनी जास्त असल्याचेही मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. यंदाच्या पहिल्या तिमाहीत कोळशाच्या उत्पादनात 10.58 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोळशाच्या पुरवठ्यात 8.50 टक्के वाढ झाली आहे अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
कोळसा उत्पादनावर मान्सूनचाही प्रभाव पडतो, हे लक्षात घेता कोळसा खाण कामाच्या क्षेत्रात 30 जून 2024 पर्यंत 98.67 मेट्रिक टन कोळसा साठा उपलब्ध (वाहतुकीतील कोळशासह) असेल याची सुनिश्चितीही मंत्रालयाने केली आहे, मागील वर्षातील या साठ्याच्या स्थितीच्या तुलनेत हे प्रमाण 33.5% ने जास्त आहे अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
सध्यस्थितीत देशातील औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळसा साठा उपलब्धता मानकांमध्ये नमुद गरजेच्या 68% इतका कोळसा साठा उपलब्ध आहे, मागील वर्षीच्या याच कालावधीतील साठा सुमारे 50% इतका होता अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.
29 जून 2024 पर्यंत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रेक / दिवसांच्या संख्येत 10.54% इतकी वाढ झाली आहे, या स्थितीवरून देशांतर्गत कोळशावर आधारित सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये पावसाच्या काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खातरजमा केली जाऊ शकते असेही मंत्रालयाने म्हटले आहे. देशभरातील सर्व देशांतर्गत कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालय एकत्रितपणे परस्पर समन्वय साधत असल्याची ग्वाही देखील मंत्रालयाने दिली आहे.