इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक निकालात आमदार किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. पण या विजयाचे खरे शिल्पकार हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे असे सांगणारी हितचिंतकाची ही व्हायरल पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये लेखक एक हितचिंतक असेही म्हटले आहे. ही पोस्ट कोणी लिहली हे समोर आले नसले तरी त्यांनी यात जवळपास सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे शिक्षक निवडणुकीला नगर जिल्ह्यातील विद्यमान महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वर्चस्वाचीही किनार होती. लोकसभेतील पराभवाचा वचपा विखेंनी कोल्हेंचा पराभव करुन या निवडणुकीत काढला. थोरातांनी, तांबेंनी आघाडी धर्म न पाळता सगळी ताकद अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मागे उभी केली होती हे निकालातुन ही स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यामागे ‘ दगा फटका ‘ करत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाळासाहेब थोरात गट यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना सगळी रसद दिली. यामुळे विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकापर्यत जाऊ शकले. यात जेष्ठ नेते शरद पवार, रोहित पवार यांच्या “रयत”नेही कोल्हे यांनाच मदत केल्याचे दिसते. मतदानाच्या काही तास आधी कोल्हे यांच्यासाठी शिवसेना (उबाठा गट) यांचे उमेदवार गुळवे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आघाडीतील नेत्यांनी केल्याने आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. संदीप गुळवे यांच्या मागे ही गद्दारी झाली नसती तर, गुळवे यांचा विजय नक्की झाला असता. गुळवे यांच्या पराभवाने महाविकास आघाडीच्या एकतेला हा पहिला तडा गेला आहे. विधानसभा निवडणुकीत पण असेच होणार याची ही रंगीत तालीम म्हणावी लागेल.
दुसऱ्या बाजुला आपले बंधु राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युती धर्म पाळला. राजेंद्र विखे यांनाच दराडे यांची जबाबदारी दिली यातच आमदार दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. जिल्हात विखे पॅटर्नला लोकसभा निवडणुकीनंतर आलेली मरगळसुद्धा राजेंद्र विखे यांनी या विजयाने दुर केली आहे. प्रवरा आणि प्रवरा परिवारातील सहकारी संस्थाची सुमारे १० हजार मते आमदार दराडे यांच्या पारड्यात टाकुन राजेंद्र विखे यांनी एक हाती निकाल फिरवला. तसेच अपक्ष उमेदवार कोल्हे यांनाही नगर जिल्ह्यातच रोखले. यामुळे मतमोजणी आधीच विजयाचे बॅनर लावलेल्या कोल्हे यांना तोंडघशी पडावे लागले. डॉ.राजेंद्र विखे यांनी स्वतःच्या विजयासाठी केलेले मतांचे नियोजन मोठ्या मनाने दराडे यांच्या पारड्यात टाकले. राजेंद्र विखेंची ही मत पेरणी लक्षवेधी ठरली. विखेंच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांचे नियोजन राजेंद्र विखेंकडेच दिले जाणार असे या निकालानंतर नक्की झालय.
या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्म न पाळल्यामुळे खासदार संजय राऊत आणि थोरात यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थोरात यांच्या या वागण्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्ष नेतृत्वाला बरोबर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवधनुष्य अधिक बळकट केले आहे. त्यामुळे दराडे यांच्या विजयी धनुष्यात विखेंच्या मतांचे बाण अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही.. मित्र पक्षांची एकी हा महायुतीला शुभशकून असून मित्र पक्षातील फूट हा महाविकास आघाडीला धोक्याची घंटा आहे.
(लेखक – एक हितचिंतक)