नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात वाहन बाजूला घेण्याच्या वादातून टोळक्याने वाहनचालकास लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत चारचाकी चालक जखमी झाला असून, याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार,पप्पू विलास जाधव व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. निखील ज्ञानेश्वर जाचक (रा.रामचंद्र नगर,गवळाणे रोड पाथर्डी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत निखीलचा भाऊ सागर जाचक हे जखमी झाले आहेत. जाचक शनिवारी (दि.२८) रात्री आपल्या वाहनातून प्रवास करीत असतांना रस्त्यात उभे असलेले अन्य वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने ही घटना घडली. गारवा हॉटेल पासून जाचक वक्रतुंड हॉस्पिटलच्या दिशेने जात असतांना हा वाद झाला.
यावेळी संशयित टोळक्याने सागर जाचक यांना शिवीगाळ करीत लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत जाचक गंभीर जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.