नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोविंदनगर भागात युवतीचा विनयभंग करीत एकाने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे बोलले जात असून याप्रकरणी तिघांविरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ चव्हाण, हेमंत चव्हाण व राहूल चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत २० वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पीडित युवती व तिचा मित्र तुषार शेट्टी शुक्रवारी (दि.२८) रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या बिल्डींगच्या लिफ्टमधून पार्किंगच्या आवारात आले असता ही घटना घडली.
लिफ्टचा दरवाजा उघडताच समर्थ चव्हाण उभा होता. त्याने चाकू काढून तुषारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरूणीने विरोध केला असता संशयिताने मारहाण करीत तिचा विनयभंग केला. या घटनेप्रसंगी संशयिताचे वडिल हेमंत चव्हाण तेथे आले असता त्याने शिवीगाळ करीत तुषारच्या पोटावर चाकूने वार केला. या घटनेनंतर जिल्हा रूग्णालयात हेमंत चव्हाण व राहूल चव्हाण यांनी युवतीस मै सब का गेम बजा डालूंगा किसको नही छोडूंगा अब तुम गये, मै देखता हू समर्थ को कौन हात लगाता है अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.