नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली. या मतमोजणीत चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती. मात्र या ठिकाणी मतपेटीत ९३८ मतपत्रिका आढळून आल्या. नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड मतदान केंद्राच्या मतपेटीत एक – एक मतपत्रिका जास्त आढळून आली. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. या पाच मतपत्रिका तूर्त बाजूला ठेवण्यात आल्या आहे. जास्त मतपत्रिका आढळल्यामुळे काही काळ गोंधळ होता.
पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले असून त्याची मोजणी ३० टेबलवर होत आहे. पहिले वैध मते ठरवली जाणार आहे. त्यानंतर ५० मतांचे गठ्ठे बांधले जाणार आहे. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. कोटा पूर्ण होईपर्यंत दुस-या पसंतीच्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकाने मतदान असल्यामुळे या मतमोजणीला उशीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गडाम यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी सुरु आहे.