मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्ष उलटूनही समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना २५ लाखांच्या मदतीचा सरकारला विसर पडला आहे. म्हणे, आम्ही तत्पर सरकार! अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्यांनी पुढे म्हटले आहे, वर्ष उलटूनही समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना २५ लाखांच्या मदतीचा विसर पडला आहे. समृद्धी महामार्गावर लक्झरी बस जळून मृत्युमुखी पडलेल्या २५ प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ६ कोटी २५ लाख रुपयांची मदत या माध्यमातून दिली जाणार होती. पण घटनेला आज, १ जुलै रोजी वर्ष पूर्ण होत असतानाही घोषणेतील मदत मिळालेली नाही.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आधार हिरावले गेल्याने पीडित कुटुंबांचे वर्तमान आणि भविष्य अंधकारमय झाले आहे .तेजस्विनी राऊत ही पुण्याला नोकरी करत होती. घरातील कर्ती मुलगी गेली, भाऊ गतिमंद आहे. त्यामुळे तिच्या आईवर धुणीभांडी करण्याची वेळ आली आहे.
प्रथमेश खोडे याची आईदेखील निराधार जीवन जगत आहे. तेजस पोकळे हा एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडल्याने आईवडीलदेखील निराधार झाले आहेत. करण बुधबावरे हा अनुकंपा तत्त्वावर टपाल विभागात नोकरीला लागला होता. त्याची आई वृद्ध असल्याने शासकीय सेवेत लागू शकत नाही. परिणामी मजुरीने काम करीत एकल जीवन जगत आहेत. सुशील खेळकर हा कमावता मुलगा होता. सुशील गेल्याने आईवडिलांच्या आधाराची काठी मोडली आहे. हीच स्थिती झोया शेखच्या कुटुंबीयांचीही आहे.