इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुका आल्यामुळे सध्या त्यांना लाडकी बहीण-भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यावर खा. सुळे यांनी त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. उशिरा का होईना सरकारला जाग आली असली, तरी या योजनेमध्ये खूप त्रुटी आहेत. त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. अभ्यासानंतर भूमिका स्पष्ट करू, असे सांगताना जुमलांचा पाऊस या अर्थसंकल्पात अपेक्षित होता. त्यामुळे त्यात वेगळे काही नाही, असे त्या म्हणाल्या.
खा. सुळे यांनी सदानंद सुळे यांच्यासह आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला बळीराजाला न्याय मिळू दे, असे साकडे खा. सुळे यांनी घातले.
बीडमधील परळीमध्ये सरपंचाची हत्या करण्यात आली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना खा. सुळे म्हणाल्या, की मी एक ते सव्वा वर्षापासून गृहमंत्रालयाच्या कारभारावराची लक्तरे वेशीवर टांगत आहे. पोलिसांबद्दल मला प्रचंड प्रेम, आदर आणि विश्वास आहे; मात्र गृहमंत्रालयाचा कारभार अतिशय भोंगळ आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. त्यावर गृह मंत्रालयाचे नियंत्रण नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे’, अशी टीका खा. सुळे यांनी केली.