इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
‘धर्मवीर – २’… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पार पडला. बॉलिवूड अभिनेते बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या शुभहस्ते या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा संपन्न झाला.
यावेळी सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई, अभिनेता प्रसाद ओक, क्षितिज दाते, झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलकर, सादिक चितळीकर आणि झी स्टुडिओजचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साहिल मोशन आर्टस् आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेल्या ‘धर्मवीर-२’ साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट या सिनेमातून पुन्हा एकदा वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनी वेळोवेळी घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका आणि त्यांना साथ देता देता मी कार्यकर्ता ते राजकीय नेता म्हणून कसा घडत गेलो ते या सिनेमातून पहायला मिळेल.
येत्या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार असून, यावेळी एकाच वेळी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत तो प्रदर्शित होणार आहे.