इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलडाणा : दारू सोडवण्यासाठी गेलेल्या भक्ताला जबर मारहाण करणाऱ्या कथित महाराजाचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर दोनच दिवसांनी याच महाराजांनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास घेतला असता, हे महाराज बुलडाण्यातील असल्याचे समजले. बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्याला गजाआड करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील राजेश राठोड यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी रायपूर पोलिस ठाण्यात येऊन कथित महाराजांविरोधात फिर्याद नोंदवली. घाटनांद्रा शिवारात असलेल्या शिवगिरी संस्थानमधील शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवगिरी महाराजाचा एका भक्ताला मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढण्याच्या नावाखाली हे महाराज मारहाण करीत असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या दोन्ही व्हिडिओची दखल घेत शिवा बर्डे उर्फ शिवगिरी महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.