इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उध्दव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांत चेतना आणि ऊर्जा येण्यासाठी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केला आहे. ७ जुलैला छत्रपती संभाजीनगर येथे ‘शिवसंकल्प’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे. शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी जास्त आहे, तिथे ठाकरे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांची मेळावे घेऊन संघटन मजबूत करणार आहेत.
‘शेतकऱ्यांना न्याय देणार-गद्दारांचा कडेलोट करणार’ असे या ‘शिव संकल्प’ मेळाव्याच्या घोषवाक्य आहे. छत्रपती संभाजीनगरातील विधानसभांसाठी शिवसेना सज्ज झाली आहे.
ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षे इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या गटात थोडी नाराजी आहे. त्यातच आता ठाकरे गटाबाबतची सहानुभूती संपल्याने आता विधानसभेत खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी खास योजना आखली आहे.
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करून सत्तांतर घडवले. शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ हे पक्षाचे अधिकृत नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक मिळाले. शिवसेना फुटीनंतर पहिल्याच परीक्षेला सामोरे गेलेल्या ठाकरे यांना जागा कमी मिळाल्या. ठाणे, कल्याण आणि मुंबईतील उत्तर- पश्चिम आणि कोकणातील दोन जागा गमवाव्या लागल्याने शिवसेना थोडी बॅकफूटवर गेली आहे.