पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.
मंत्री पाटील यांनी यावेळी वारकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समवेत फुगडीचा फेरही धरला. त्यांनी टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.
प्रारंभी शंखध्वनीने दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असलेले तुळशी वृंदावन, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायन, फुगडी, नर्तनात दंग वारकरी अशा भक्तीपूर्ण वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
दिंड्यांच्या शिस्तबद्ध रांगा पुढे सरकत असताना श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.