नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिकच्या क्रीडा विशेषत: क्रिकेट क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची व अभिमानास्पद बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – च्या विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे, बीसीसी आयच्या येत्या २०२४-२५ हंगामासाठी या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या .
नाशिकचे तीन माजी रणजी पटू पुढीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्त झाले आहेत : सलिल आघारकर यंदाही महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य, सुयश बुरकुल १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा, तर अमित पाटील यांची महाराष्ट्र रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील हंगामात अमित पाटील १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. तर गेल्या पाच वर्षांपासून काम करणारे विनोद यादव यांची याही वर्षी २३ वर्षांखालील स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
तर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट समिति सदस्य शर्मिला साळी यांची खुल्या तसेच २३ वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघाच्या निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर १५ वर्षांखालील महिला संघाचे स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक म्हणून नाशिकचे प्रणव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तरुण अध्यक्ष रोहित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली, यंदा ही विविध समित्यांची निवड करून जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा ते सात जण अनेक वर्षांपासून एमसीएच्या विविध समित्यांवर, यापूर्वी देखील काम करत होतेच.
नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.