नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आचारसंहितेमुळे चार महिन्यांच्या अवकाशानंतर झालेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नोकऱ्या, रस्त्यांची कामे, अडचणी, मागण्यांच्या निवेदनांसह नागरिक याठिकाणी पोहोचले. अनेकांनी गडकरींवर अभिनंदनाचा वर्षावही केला.
गडकरी यांच्या खामला येथील कार्यालयात जनसंपर्क कार्यक्रमाला दिव्यांग, ज्येष्ठ, तरुणांसह विविध संस्था, संघटनांच्या सदस्यांनी गर्दी केली. यावेळी मंत्री महोदयांना भेटून निवेदने देतानाच लोकोपयोगी साहित्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी कुणी शेतीमधील तर कुणी वाहन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग गडकरींना दाखविले. शुभम वसुले या नागपूरच्या तरुणाने आपल्या कल्पकतेतून तयार केलेले वाहनाचे मॉडेल मंत्री महोदयांना दाखविले. गडकरी यांनी या तरुणाचे कौतुक करून त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते. विशेषत्वाने संतोष यादव यांच्यासोबत आलेल्या नागरिकांनी गडकरींचे आभार मानले. काहींनी अँजिओप्लास्टी, तर काहींनी हृदयातील व्हॉल्व रिप्लेस करून दिल्याबद्दल आभार मानले. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटता येणार म्हणून खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची गर्दी उसळली.
संजय गांधी निराधार योजना, रस्त्याची कामे, वैद्यकीय सहकार्य, नोकऱ्या आदी कामांसाठी नागरिकांनी गडकरींची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने गडकरी यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. वैय्यक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत सर्व प्रकारच्या विषयांसाठी यावेळी निवेदने देण्यात आली. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय गडकरी यांनी ऐकून घेतले. अनेक कामांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश गडकरी यांनी यावेळी दिले.