मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला. त्या जून २०२५ पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत. या पदावर पहिल्यांदा महिला अधिका-याची नियुक्ती झाली आहे.
सुजाता सौनिक या १९८७ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिवपदी कार्यभार सांभाळलेला होता. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे सेवानिवृत्त होत झाल्यामुळे त्यांच्या जागी सुजाता सौनिक यांची वर्णी लागली आहे.
या पदासाठी महसूल विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमारी, इक्बाल सिंह चहल यांच्यादेखील नावांची जोरदार चर्चा सुरु होती. पण सौनिक यांची नियुक्ती झाली. सुजाता सौनिक या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याचा तीन दशकांपासूनचा अनुभव आहे. त्यांना आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे.