इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू करा. जिल्हास्तरावर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी चांगला समन्वय ठेवा, अशा सूचना महाराष्ट्रातील भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी दिल्या. नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र भाजपच्या कोअर ग्रुपच्या झालेल्या बैठक झाली. यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी ३० प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीत भाजपच्या निवडणूक प्रभारींनी राज्यातील नेत्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करू नका, अशी तंबी दिली आहे. महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला समोर जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणे बंद करा, अशी समज दिली.
यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच होतील, असे पक्ष निरीक्षकांनी सांगितले. निवडणूक प्रभारी आणि फडणवीस हे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा करून आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार आहेत. यावेळी कोणतीही वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची समज निवडणूक प्रभारींनी कोअर ग्रुपच्या नेत्यांना दिली.
या बैठीकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माहिती देतांना सांगितले, १४ जुलै रोजी पुण्यात राज्याच्या विस्तृत कार्यकारिणी बैठक होणार असून, तिला राज्यातील साडेचार हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शाह या वेळी मार्गदर्शन करतील.