इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडाराः लग्नासाठी रायपूरवरून नागपूरकडे येणाऱ्या निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात मायलेक ठार झाले. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्री अपघात झाला.
या भीषण अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टर सुफल गजभिये (वय ५२) आणि आई कांता गजभिये (वय अंदाजे ८५) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात शिवान सुफल गजभिये (वय १४) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. सुफल गजभिये हे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी कुटुंबासहित कारने रायपूर येथून नागपूरकडे य़ेत होते. साकोली उड्डाणपुलावर रिमझिम पावसामुळे पाणी साचल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
कारमध्ये असलेल्या डॉ. सुफल गजभिये यांच्या आई कांता गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना डॉ. सुफल यांचा मृत्यू झाला. सध्या शिवान याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.