येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे शिवगंगा स्केटिंग ट्रॅक येथे आयोजित करण्यात आलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी नाशिक जिल्हयातील येवला येथील आर्यन स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला व इतिहास रचला. या चारही खेळाडूंनी सलग ७५ तास स्केटिंग केल्याने या खेळाडूंची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. या स्पर्धेत देशातून ३८८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
यातून येवल्यातील आर्यन स्केटिंग क्लबचे खेळाडू आरुषी रमेश अहिरे, पूर्वी रमेश अहिरे, प्रत्युष चेतन अट्टल, आधिश अतुल देशपांडे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सलग ७५ तास स्केटिंग केली, त्यांच्या या कामगिरीची नोंद घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर येवल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या खेळाडूंचे विविध स्तरावरून कौतुक केले जात आहे.