नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे ब्राह्मण अधिवेशन रविवारी (दि.३०) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. अधिवेशनात प्रथम व व्दितीय सत्रात विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. सायंकाळी मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रथम सत्राचे उद्घाटन उद्योजक विवेक देशपांडे, बहुभाषिक अधिवेशन, परभणी २००७ चे अध्यक्ष बंडू नाना सराफ, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन २००८ चे अध्यक्ष कालिदास थिगळे, राष्ट्रीय सचिव भाजप व प्रभारी राजस्थानचे विजया रहाटकर, ब्राह्मण सभा, जालनाचे उपाध्यक्ष रमेश देहडकर, प्रशासकीय अधिकारी मंजूषा कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
व्दितीय सत्रात समुदायिक सावरकर गीत गायन, परशुराम व रेणुका माता भजन होईल. याप्रसंगी शु. य. मा. म. ब्राह्मण संस्था, नाशिकचे कार्यवाह अॅड. भानूदास शौचे हे ब्राह्मण समाज आणि संघटन, छत्रपती संभाजीनगरचे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांचे आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती, शिवसेना (उबाठा) महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे ब्राह्मण युवक आणि राजकारण, देवगिरी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण नांदेडकर यांचे ब्राह्मण समाजासाठी शासकीय कर्ज योजना, सरकारी वकील अॅड. गोविंद कुलकर्णी यांचे न्यायालयीन व्यवस्थामध्ये ब्राह्मण समाजाचे योगदान, पं. विजय देशमुख यांचे जीवन गौरव (संगीत विभाग), ज्योतिष आचार्य, पुणे येथील श्रुती कुलकर्णी यांचे गूढशात्र व करियर संधी या विषयावर मनोगत व्यक्त करतील.
याप्रसंगी बजाज अॅटोचे सी. पी. त्रिपाठी व श्री राजस्थानी विप्रो मंडळाचे राजेश बुटोले उपस्थित राहणार आहेत. या सत्राचा समारोप आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीर दास महाराज, काळाराम मंदिरतर्फे ब्राह्मण आणि संस्कार या विषयाने होईल. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता सर्व संघटना अध्यक्षांचा सत्कार आणि ठराव मंजूर करण्यात येईल. याप्रसंगी ब्राह्मण समाजातील उपोषणकर्ते, भजनी मंडळ, मंगळागौर ग्रुप, पत्रकार यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक व राजकीय पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या अधिवेशनास ब्राह्मण समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.