इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय अंतर्गत कार्यरत पासपोर्ट सेवा केंद्र, लोअर परळ, मुंबई आणि पासपोर्ट सेवा केंद्र मालाड, मुंबई येथे नियुक्त अधिकारी एजंट यांच्याबरोबर संगनमताने भ्रष्टाचारात गुंतले असल्याच्या आरोपावरून, सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर नियुक्त पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक अधिकाऱ्यांसह १४ अधिकाऱ्यांवर तसेच अठरा पासपोर्ट सुविधा एजंट यांच्याविरोधात १२ गुन्हे दाखल केले आहेत. हे अधिकारी पासपोर्ट सुविधा पुरवणाऱ्या एजंट्सच्या नियमित संपर्कात होते. अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे किंवा पासपोर्ट अर्जदारांच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये फेरफार करून पासपोर्ट जारी करण्याच्या बदल्यात गैरफायदा मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
२६ जून रोजी, परराष्ट्र मंत्रालयाच्या व्यवहार पासपोर्ट सेवा कार्यक्रम विभागाचे दक्षता अधिकारी आणि मुंबईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर छापे टाकले. या धडक कारवाईदरम्यान संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील डेस्क आणि मोबाईल फोनचे विश्लेषण, सीबीआय पथक आणि पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचे दक्षता अधिकारी यांनी संयुक्तपणे केले. कागदपत्रे, सोशल मीडिया चॅट्स आणि संशयित अधिकाऱ्यांच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आयडी व्यवहारांच्या विश्लेषणातून पासपोर्ट सेवा केंद्रांच्या काही अधिकाऱ्यांकडून अपुऱ्या/खोट्या /बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी करण्यासाठी पासपोर्ट सुविधा एजंट्सच्या माध्यमातून मोठी रक्कम उकळल्याचे दर्शवणारे विविध संशयास्पद व्यवहार उघडकीस आले.
पासपोर्ट सेवा केंद्रांचे संशयित अधिकारी, विविध पासपोर्ट सुविधा एजंट/ दलाल यांच्या संगनमताने थेट त्यांच्या स्वत:च्या बँक खात्यांमध्ये किंवा त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या/ कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपये जमा करुन घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीबीआयने मुंबई आणि नाशिक येथील काही सरकारी अधिकारी तसेच काही खासगी व्यक्तींशी संबंधित ३३पास ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये पासपोर्ट तयार करण्याशी संबंधित अनेक कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती लागले. अधिक तपास सुरु आहे.