इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ वर भारतीय संघाने उमटवली आपली मोहोर…दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रेट टीम इंडियाचे कौतुक केले.
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. भारतीय संघाने समोर ठेवलेले १७७ धावांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असे वाटत होते.
पण रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघाने एक नेत्रदीपक विजय मिळवत आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. चक दे इंडिया असेही त्यांनी शेवटी म्हटले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.