नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागलाण तालुक्यातील बुंधाटे येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण हिरामण ठाकरे (५१)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुंधाटे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले नारायण ठाकरे हे नियमित प्रमाणे शाळेत उपस्थित होते. दिवसभर शाळेचे कामकाज करून काल ५ वाजता शाळेची सुट्टी झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना बायपास रस्त्याच्या बाजुला जाण्यासाठी मदत करत असतांना अचानक ठाकरे यांच्या छातीत कळ येऊन ते जागेवर कोसळले. ही घटना आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिक्षक ठाकरे यांना तपासले असता हृदयविकाराचा तीव्र झटक्यांमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
शांत व मनमिळाऊ स्वभावाचे शिक्षक म्हणून ठाकरे यांची ओळख होती तालुक्यातील मुळगाव असलेल्या मोरकुरे येथील ते रहिवाशी होते. त्यांच्या मृत्यूने शिक्षण विभागासह बुंधाटे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रात्री उशिरा डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात येऊन मुळगाव असलेल्या मोरकुरे येथे अंतिम संस्कार करण्यात आले. शिक्षक ठाकरे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी एक मुलगी आहे.