नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आडगाव शिवारातील निवृत्तीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश दशरथ साबळे (रा.श्रीवास्तू प्राईड अपा.निवृत्तीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे कुटुंबिय बुधवारी (दि.२६) सकाळी नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ४२ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.