इंडीया दर्पण ऑनलाईन डेस्क –
आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅण्डचा३०९ धावांनी दणदणीत पराभव केला. नेदरलॅण्डने द.आफ्रिकेचा पराभव करून स्पर्धेत काही काळासाठी सनसनी निर्माण केली होती. परंतु, ती अल्पायुशी ठरल्यामुळे ५ सामन्यात ४ पराभवानंतर या संघाचे आव्हान अपेक्षेप्रमाणे संपल्यात जमा झाले आहे. या विजयाने मात्र गुणांच्या तालिकेत मागे पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अंगावरचे मुठभर मास वाढणार असून ५ सामन्यात ६ गुण मिळवून या संघाने आता स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३९९ धावसंख्येला उत्तर देतांना नेदरलॅण्डचा संपुर्ण संघ २१ व्या षटकातच अवघ्या ९० धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्याअॅडम झाम्पाने अवघ्या ३ षटकात ४ बळी घेतले. विश्वचषकाच्या इतिहासातील वेगवान शतक करणारा ग्लेन मॅक्सवेल हा सामन्याचा मानकरी ठरला.
आज नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला होता. डेव्हिड वॉर्नर १०४ धावा, स्टीव्ह स्मिथ ७१ धावा, लाबुशेन ६२ धावा आणि मॅक्सवेल १०६ धावा अशी दमदार बॅटींग आज बघायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज आज स्वत:चा फॉर्म परत आणण्यासाठी दुबळ्या नेदरलॅण्ड समोर जोमात खेळल्यामुळे ५० षटकात ४०० धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलिया संघाला उभे करता आले. हा सामना आज राजधानी दिल्लीत खेळला गेला.
मॅक्सवेल – वर्ल्डकप इतिहासातले वेगवान शतक
विश्वचषक स्पर्धा ही इतिहासातील आकडेवारी बदलण्यासाठीच असते याचा आज प्रत्यय आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने अगदी टी२० स्टाईलमध्ये नेदरलॅण्डच्या नवख्या गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या ४० चेंडूत १०० धावा केल्या. आजपर्यन्तच्या विश्वचषक इतिहासातली ही सर्वाधिक कमी चेंडूतली सेंच्युरी ठरली आहे. मॅक्सवेल १०६ धावांवर बाद झाला. मुळात मॅक्सवेल ६ व्या क्रमांकावर खेळायला आला तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा संघ सुस्थितीत होता. डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी एक भक्कम धावसंख्या उभारलेली होती. मॅक्सवेलने याच परीस्थितीचा फायदा उचलत तब्बल ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०६ धावांची वेगवान खेळी उभारली. नेदरलॅण्डच्या लोगन वीकने ४ बळी घेतले खरे परंतु त्यासाठी त्याला ७.४० च्या सरासरीने धावा मोजाव्या लागल्या.
आता उद्या बेंगलुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात लढत होईल. अंक तालिकेत इंग्लड नवव्या तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे.