नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दहशत माजविणा-या सराईता विरोधात शहर पोलीसांनी स्थानबद्धतेची (एमपीडीए) कारवाई केली आहे. संशयिताची नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा दहशत निर्माण करत होता.
अनिकेत उर्फ केरला राजू जॉन (२३, रा. सुभाषरोड, नाशिकरोड) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सराईत गुन्हेगार केरला याच्या विरोधात नाशिकरोड, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखविणे, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, महिलांची छेडछाड, अपहरण, मनाई आदेशाचे उल्लंघन यासारखे सुमारे ९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईसह एक वषार्ची तडीपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्याच्यात सुधारणा न झाल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली असून, त्यास नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. येत्या काही दिवसात आणखी काही सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर स्वरुपाच्या कारवाई केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.