इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राज्यात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी ८३८ शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत झाल्या असून फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये २१५ आणि एप्रिलमध्ये १८० आत्महत्या झाल्या. या चार महिन्यांत दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले.
अमरावती विभागात सर्वाधिक ३८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. छत्रपती संभाजीनगर विभागात २६७ शेतकऱ्यांनी नागपूर विभागात ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्ध्यात ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगर जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
शेतकऱ्यांच्या ८३८ आत्महत्यांपैकी १७१ शेतकरी आत्महत्या प्रकरणे वैध आढळली असून आतापर्यंत फक्त १०४ शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत सरकारकडून देण्यात आली. ६२ शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. ६०५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.