इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः ‘नीट’ पेपर फुटीप्रकरण सरकारच्या गळ्यातला काटा बनला आहे. या मुद्द्यावरून विरोधक दररोज सरकारला कोंडीत पकडत आहेत. विरोधक ‘एनडीए’ सरकारवर चर्चा करण्यासाठी दबाव आणत आहेत. लोकसभेत आज पुन्हा एकदा पेपर फुटीप्रकरणी चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली; मात्र सभापती ओम बिर्ला यांनी तात्काळ वेळ देण्यास नकार दिला. त्यानंतर गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये ‘नीट’च्या चर्चेवरून बाचाबाची झाली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी माईक बंद केल्याचे सांगितले. त्यांच्या आरोपावर बिर्ला यांनी सांगितले, की येथे माईक बंद करण्याचे कोणतेही बटन नाही; परंतु माईक बंद करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. ‘नीट’ पेपरफुटीवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी खासदारांकडून सातत्याने होत होती. यावर बिर्ला म्हणाले, की तुम्हा सर्वांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल, असे आधीच कळवले आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना सरकारने प्रतिसाद द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. तुम्ही तपशीलवार चर्चा करा.
या काळात विरोधी खासदारांनी ‘नीट’च्या मुद्यावरून गोंधळ घालणे सुरूच ठेवले. बिर्ला म्हणाले की, जेव्हा तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला जातो, तेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, असे त्यांनी राहुल गांधींना सुनावले. अशा परिस्थितीत तुम्ही संसदीय शिष्टाचाराचे पालन कराल, ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. यावेळी राहुलसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी आमचा माईक बंद केल्याचे सभापतींना सांगितले.
सभापतींनी ‘नीट’ वर चर्चा करण्यात स्वारस्य दाखवले नाही आणि टेबलवर ठेवलेल्या इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी खासदारांची नावे बोलावण्यास सुरुवात केली. माईक बंद करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्षाने ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मवर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, की अशी क्षुल्लक कृत्ये करून तरुणांचा आवाज दाबण्याचे षडयंत्र रचले जात आहे.