इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी टी २० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाने -इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत इंग्लंडला १७१ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने सर्व विकेट गमावत १०३ धावा केल्या. या सामन्यात भारताने ६८ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. इंग्लंडला पराभूत करत २०२२ सेमी फायनलमधील पराभवाचा वचपा भारतीय संघाने आज काढला.
भारतीय संघाची धुरा रोहित शर्मा तर इंग्लंडची धुरा जॉस बटलरकडे होती. त्यात शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज वरचढ ठरला. भारतीय संघाची सेमी फायनलमध्ये खेळण्याची पाचवी वेळ होती. टॅास इंग्लंडने जिंकल्यानंतर भारतीय संघाला पहिले फलंदाजी देण्यात आली. त्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ५७, सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. भारतीय संघाची फलंदाजीची सुरुवात फार चांगली झाली नाही. विराट कोहली १९ धावा असताना ९ रन्स करुन बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत ४ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती २ बाद ४० अशी झाली. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी भारतयी संघाचा डाव सावरला आणि चांगल्या स्थितीत आणून ठेवले. या दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली. रोहित ५७ आणि सूर्या ४७ धावा करुन माघारी परतले. त्यानंतर रवींद्र जडेजाने नाबाद १७ धावा जोडल्या. हार्दिक पंड्याने २३ रन्स केल्या. अक्षर पटेलने १० धावा केल्या. तर अर्शदीप सिंहने १ धाव केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर आदिल रशीद, सॅम करन, जोफ्रा आर्चर आणि रिस टोपली या चौघांनी १-१ विकेट घेतली.
भारतीय संघाने गोलंदाजी अप्रितम होती. या सामन्यात अक्षर पटेल व कुलदीप यादव याने प्रत्येक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहाने २ विकेट घेतल्या.