इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : ऑटोमोबाइल क्षेत्रातील टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी विकिपीडीयाला अनोखी ऑफर दिली आहे. त्यांनी विकिपीडीयाला नाव बदलण्यास सांगितले आहे. मुख्य म्हणजे विकिपीडीयाने नाव बदलल्यास त्या बदल्यात त्यांना कोट्यवधींचा लाभ होणार असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे.
आपल्या अनोख्या कार्यशैलीने एलन मस्क यांनी संपूर्ण कर्पोरेट क्षेत्राला धक्का दिला आहे. एक्सच्या कार्यालयात प्रवेश करताना हातात कमोड घेऊन जाणे असो वा कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक कमी करणे असो. एकामागोमाग एक धक्के देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी विकिपीडीयाला ऑफर दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की विकिपीडियाने त्यांचे नाव बदलल्यास ते त्याला एक अब्ज डॉलर्स देतील. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘विकिपीडियाने त्यांचे नाव बदलून डिकिपीडिया केले तर मी त्यांना एक अब्ज डॉलर्स देईन.’ यावर एका यूजरने विकिपीडियाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, पैसे मिळताच तुम्ही तुमचे जुने नाव परत वापरा. त्यावर मस्क यांनी एक अट घातली. मस्क म्हणाले की, ‘मी वेडा नाही. विकिपीडियाला किमान वर्षभर तरी त्या नव्या नावासह इंटरनेटवर अस्तित्व ठेवावे लागेल. इतकेच नाही तर मस्कने आणखी एका ट्विटमध्ये विकिपीडियाच्या होमपेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये विकिपीडियाचे सहसंस्थापक जिमी वेल्स यांच्या वतीने ‘विकिपीडिया विक्रीसाठी नाही’ असे आवाहन करण्यात आले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
टेस्ला आणि ‘स्पेसएक्स’चे मालक मस्क यांनी या वर्षी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतली आणि त्याचे नाव बदलून ‘एक्स’ केले. याशिवाय त्यांनी त्यात अनेक बदलही केले. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार, मस्क २०४ अब्ज अमेरिकन डॉलरइतक्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.