इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधीमंडळाचे अधिवेशन असतांना आमदार रोहित पवार यांनी आरोग्य व्यवस्थेवर टीका करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून त्यात गर्भवती महिलेला झोळीतून नेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? असा प्रश्नही उपस्थितीत केला आहे.
या पोस्टमध्ये पवार यांनी म्हटले आहे की, सामान्यांचं सरकार अशी जाहीरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्षे केंद्रात मंत्री होते… हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्लं जातंच पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्बुलन्स खरेदीत #खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्बुलन्सही देता येऊ नये? त्यामुळंच प्रसूतीकळा आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागलं. मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाही का?