पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विकास विभागामार्फत ६०२ विविध रिक्त पदे भरण्याकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६ नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुन:श्च प्रसिद्ध करण्याच्या सूचना असल्याने २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या गट ‘क’ च्या पद भरती प्रक्रियेस तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे, असे आदिवासी विकास विभागाने कळविले आहे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग संवर्गाचा जाहिरातीत समावेश करुन तसेच पुन:श्च बिंदूनामावली अद्ययावत करुन गट-क संवर्गासाठी पुन:श्च जाहीरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुन:श्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
क्षेत्रीय कार्यालयाची बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल. तसेच ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले आहेत त्यांनी या बदलाबाबतची नोंद घ्यावी, असे नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी कळविले आहे.