नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– म्हसरूळ परिसरात तंबाखू पुड्या देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांनी दुकानदारास तलवारीचा धाक दाखवत पानस्टॉलमधील सामानाचे नुकसान केले. या घटनेत तलवारीने दुकानातील साहित्य जमिनीवर पाडण्यात आल्याने दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विविध कलमासह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव व सिध्दार्थ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गावगुंडाची नावे असून याप्रकरणी भुषण कैलास देशमुख (रा.कॅनडा कॉर्नर) या व्यवसायीकाने फिर्याद दिली आहे. देशमुख यांची म्हसरूळ गावातील गजपंथ येथे जैन मंदिरास लागून गणेश पान स्टॉल नावाची पान टपरी आहे. या टपरीवर मंगळवारी (दि.२५) भाऊ हर्षद देशमुख व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास हर्षद दुकानावर असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्याकडे युवराज आण्णाने दोनचार तंबाखूच्या पुड्या मागितल्याचे सांगितले.
यावेळी हर्षदने भुषण यांच्याशी संपर्क साधून पुड्या देतांना पुर्ण पुडाच घेवून जा असे रागात म्हटल्याने ही घटना घडली.
रात्री भुषण दुकानावर असतांना आठच्या सुमारास पुन्हा दुकानावर दोघे संशयित आले. यावेळी त्यांनी धारदार तलवार पानस्टॉलच्या काऊंटरवर आपटत का रे तु आमच्या युवराज भाईला शिवागाळ करतो का ? असे बोलून भुषण देशमुख यांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त दोघांनी भाईने तुझा गेम करण्यास सांगितल्याचे म्हणत तलवारीने दुकानातील माल काढून टपरीच्या बाहेर फेकून दिला. भेदरलेल्या देशमुख यांनी तलवारीचे वार चुकवीत टपरीतील कोपरा पकडल्याने अनर्थ टळला. या घटनेत मोठे नुकसान करून संशयितांनी दुचाकीवर पोबारा केला असून अधिक तपास इपनिरीक्षक पटारे करीत आहेत.