मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिह्यातील कोटमगावचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करुन या विकास आराखड्याला त्वरीत मान्यता द्यावी अशी मागणी आज राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी केली. आज विधानभवन येथे श्री.जगदंबा देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला नियोजन विभागाकडून मंजूरीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीसाठी नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन संचालक जयश्री भोज तसेच ऑनलाईन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, सचिन कळमकर, आदि उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कोटमगाव येथील श्री.जगदंबा देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिध्द असे देवस्थान असून येथे शारदीय नवरात्र उत्सवात तसेच वर्षभर लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. काही मुलभूत सुविधांच्या अभावी येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे या तीर्थस्थळी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७५ कोटी रक्कमेचे अंदाजपत्रक व आराखडा तयार केलेला असून जिल्हाधिकारी, नाशिक यांनी कार्यकारी समितीवर मंजुरी घेऊन १ जानेवारी २०२४ च्या पत्रान्वये सदर सविस्तर प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविलेला आहे. हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करुन या विकास आराखड्याला मान्यता मिळावी अशी सुचना भुजबळ यांनी केली.
सदर आराखड्याला आठवडाभरात जिल्हास्तरीय समितीची मंजूरी घेऊन हा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीमध्ये तसेच शिखर समिती बैठकीमध्ये ठेवण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी दिले.