इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : हिरे आणि हिऱ्याच्या दागिन्यांसाठी कायमच मुंबई आणि सुरत या दोन आर्थिक सत्तांमध्ये स्पर्धा राहिली आहे. या व्यावसायात गुजराती, मुस्लिम, कच्छी तसेच मराठी व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या व्यापाराने गुजरात आणि महाराष्ट्रातील आर्थिक सत्ताकारणावर कायम प्रभाव टाकला आहे. अशात आता सुरत येथे सुरू डायमंड बोर्स सुरू होत आहे. परिणामत: मुंबईतील अनेक व्यापारी गुजरातला जात असून त्यांच्या रुपाने हा संपूर्ण व्यापार महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला खिळखिळे करण्यात येत असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. एकामागून एक प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले आहे. प्रमुख संस्था तसेच कार्यालये गुजरातला जाताहेत. अशातच आता सुरत डायमंड बोर्समुळे संपूर्ण हिरे व्यापार गुजरातला हलविण्याची तयारी दिसून येत आहे. याचा फटका महाराष्ट्राला आणि प्रामुख्याने मुंबईला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
डायमंड बोर्सची इमारत अमेरिकेतील पेंटागॉनपेक्षाही मोठी आहे. ३५ एकर परिसरात आयताकार असलेली ही इमारत १५ मजली आहे. यात एकूण १३१ एलिवेटर्स आहेत. भारतीय आर्किटेक्चर फर्म मॉर्फोजेनेसिसने ही बिल्डिंग डिझाइन केली आहे. ही तयार होण्यासाठी तब्बल ४ वर्षे लागली. संपूर्ण प्रकल्पाची किंमत ३२ अब्ज रुपये आहे. ही इमारत तयार होण्याआधी डायमंड कंपन्यांनी ऑफिस खरेदी केले आहेत. उद्घाटन झाल्यानंतर या बिल्डिंगमध्ये ६५ हजारपेक्षा अधिक हिरा प्रोफेशनल्स एकत्र काम करतील. ज्यात पॉलिशर्स, कटर्स, व्यापारी यांचा समावेश आहे.