इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांनी ४ जुलै २०२४ सकाळी १० वाजता विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी बंदही पुकारला आहे. संघटनेने गेल्या बऱ्याच वर्षांपासुन पाठपुरावा करत असुन कोणतेही काम होत नाही, फक्त आश्वासन दिली जातात, म्हणून संघटनेने बुधवार दि. ४ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वा नाशिक शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक, येथे निवेदन देण्यासाठी शांततेने आमचे सभासद वाहतुकदार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी असणार आहेत.
या आंदोलनाचा मार्ग अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) ते त्र्यंबक नाका, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे समारोप हा असणार आहे. या आंदोलनाला मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेने पाठींबा दिला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या..
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलच्या जागेवर इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरीत करावे.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आडगाव नाका येथे इंदोरच्या धर्तीवर (ट्रान्सपोर्ट नगर) म्हणुन विकसित करावे यात ट्रक साठी सुरक्षित वाहनतळ, वाहतूक व्यवसायीकांसाठी गाळे, गॅरेज स्पेअर पार्टसाठी व्यवस्था व सारथी सुविधा केंद्र असावे.
३) महापालिका हद्दीतील शहराच्या चारही दिशाना बंद पडलेले जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणुन विकसित करावे.
४) अंबड MIDC मध्ये होत असलेले ट्रक टर्मिनल संघटनेला ना नफा ना तोटा या तत्वावर चालवायला द्यावे.
५) शहरातील टेम्पो स्टॅन्डची जागा कायम करुन द्यावी.
६) द्वारका येथील सर्कल काढुन रस्ता ओलांडण्यासाठी बनवलेला भुयारी मार्ग स्कुटर रिक्षा साठी चालु करून दयावा व नाशिक रोड कडून येणारी वाहतुक इंदिरा नगर टाकळी कडे बंद करुन द्वारकावर आणावी.
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल मधून श्वान निर्बिजीकरण त्वरित थांबवावे.
८) परिवहन RTO विभागाद्वारे गाडी पासिंगसाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात.
९) महाराष्ट्राचे चेक पोस्ट बॉर्डर बंद करा.