चंदीगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर आता पंजाबमध्ये सुध्दा एका पक्षाची दोन शक्कले होणार आहे. त्यामागे भाजप असल्याचे बोलले जात आहे. हा पक्ष दुसरा तिसरा कोणी नसून तो पंजाबमधील भाजपचा अगोदर मित्र पक्ष असलेला शिरोमणी अकाली दल आहे. लोकसभेत आलेल्या मोठया अपयशानंतर या पक्षात दोन गट पडल्याचेही दुसरीकडे बोलले जात आहे. गेल्या ३० वर्षांपासून या पक्षाची कमान बादल कुटुंबाकडे आहे. पण, आता बंडखोरीची शक्यता असून ही कमान इतर नेत्याच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात बंडखोरी झाली असून अकाली दलाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी बादल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते मनप्रीत सिंग अयाली यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. इक्बाल सिंग झुंडा समितीच्या शिफारशी लागू केल्याशिवाय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. झुंडा समितीने पक्ष सुधारणेसाठी काही शिफारशी केल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
जालंधरमध्ये अकाली दलाच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. पक्षाच्या काही जिल्ह्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते, तर दुसरी बैठक पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या अध्यक्षतेखाली होऊन लोकसभा निवडणुकीतील अकाली दलाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. जालंधरमध्ये झालेल्या बैठकीनंतर बंडखोर नेत्यांनी एक जुलैपासून ‘शिरोमणी अकाली दल बचाओ आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला. बंडखोर नेत्यांच्या या बैठकीला माजी खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा, माजी एसजीपीसी अध्यक्षा बीबी जागीर कौर, माजी मंत्री परमिंदर सिंह धिंडसा, माजी आमदार सिकंदर सिंह मलुका, सुरजितसिंग राखरा आदी बडे नेते उपस्थित होते.