इंडीया दर्पण ऑनलाईन डेस्क –
विश्वचषक स्पर्धा ही इतिहासातील आकडेवारी बदलण्यासाठीच असते याचा आज प्रत्यय आला. ऑस्ट्रेलिया वि. नेदरलॅण्ड या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने अगदी टी२० स्टाईलमध्ये नेदरलॅण्डच्या नवख्या गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या ४० चेंडूत १०० धावा केल्या.
आजपर्यन्तच्या विश्वचषक इतिहासातली ही सर्वाधिक कमी चेंडूतली सेंच्युरी ठरली आहे. मॅक्सवेल १०६ धावांवर बाद झाला. मुळात मॅक्सवेल ६ व्या क्रमांकावर खेळायला येतो. तो आला त्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा संघ सुस्थितीत होता. डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी एक भक्कम धावसंख्या उभारलेली होती.
मॅक्सवेलने याच परीस्थितीचा फायदा उचलत तब्बल ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०६ धावांची गतिमान खेळी उभारली. या धावसंख्येमुळे ऑस्ट्रेलियासंघाने नेदरलॅण्डला विजयासाठी ५० षटकात ४०० धावा करण्याचे आव्हान दिले आहे.