नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने भारताच्या ग्रामीण भागातील लाखो खादी कारागिरांना विशेष आनंद दिला. 21 जून रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (केव्हीआयसी) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने देशभरातील 55 खादी संस्थांद्वारे विविध सरकारी विभागांना 8,67,87,380 रुपये मूल्याचे 1,09,022 योग मॅट आणि 63,700 योग पोषाखांची विक्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्रँड पॉवर’मुळे योगाभ्यासाचा भारतीय वारसा तसेच खादी लोकप्रिय झाली असल्याचे ही आकडेवारी जाहीर करताना खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी नमूद केले.
जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावेळी केव्हीआयसी ने आयुष मंत्रालयाच्या मागणीनुसार खास खादी योग कुर्ते (टी-शर्ट सारखे) तयार केले. हे खास तरुणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले होते. योग दिनानिमित्त, दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे असलेल्या केव्हीआयसी च्या खादी भवनने एकट्या आयुष मंत्रालयाला 50,000 योग मॅट आणि 50,000 योग पोषाखांचा पुरवठा केला. यामध्ये 300 उच्च दर्जाच्या योग मॅट्सचाही समावेश होता. यासोबतच मंत्रालयाच्या मागणीनुसार श्रीनगरमध्ये 25 हजार खादी योग मॅट आणि 10,000 योग पोषाख पुरवण्यात आले. श्रीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक खादीचे कपडे परिधान करून योगाभ्यासात सहभागी झाले.
आयुष मंत्रालयाव्यतिरिक्त, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रामुख्याने मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था, राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूर आणि पंचकुला, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ओएनजीसी आणि नाल्को यांना योगाभ्यासासाठी खादीपासून बनविलेले योग पोशाख आणि योग मॅट्सचा पुरवठा केला. एकूण 8,67,87,380 रुपये मूल्याच्या विक्रीत, खादी योग कपड्यांची विक्री 3,86,65,900 रुपये मूल्याची तर मॅटची विक्री 4,81,21,480 रुपये मूल्याची होती. मागणीनुसार, केव्हीआयसी ने आधीच देशभरातील खादी संस्थांना पुरवठ्यासाठी सूचित केले होते, ज्यात गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्लीतील 55 संस्थांचा समावेश होता. याद्वारे खादी संस्थांमध्ये काम करणाऱ्या सूतगिरणी, विणकर आणि खादी कामगारांना अतिरिक्त वेतनाबरोबरच अतिरिक्त रोजगाराच्या संधीही लाभल्या.