मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गुजराती ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटकेच केली, अशी टीका त्यांनी केली.
पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, की विरोधी पक्षाला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात टाकले. भाजपाविरोधी होते, हाच त्यांचा दोष होता. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, याचा साक्षात्कार मोदी यांना दहा वर्षांनंतर प्रथमच झाला आहे. देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा, असे मोदी आता म्हणतात; पण दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचे काम याच मोदी यांनी केले. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि बाहेर जे कोणी देशाच्या तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतील, त्यांना एकतर भाजपत आणायचे किंवा तुरुंगात टाकायचे हे त्यांचे धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचे होते काय, असा सवाल ठाकरे यांनी केला.
मोदी यांनी संसदेत आणि बाहेर दहा वर्षे जे केले, त्यास नौटंकी म्हणतात, अशी टीका करून ठाकरे यांनी आता बहुमत गमावल्यावर मोदी थोडे जमिनीवर आले आहेत, असे सांगितले. देशाच्या जनतेला संसदेत नौटंकी, हंगामा, नारेबाजी नको. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे, असे मोदी यांनी म्हणणे म्हणजे हुकूमशहाने गीता वाचण्यासारखेच आहे, अशी टीका त्यांनी केली.