नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आज मतदान होणार आहे. नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील ७० हजाराच्या आसपास असलेले शिक्षक आज मतदान करणार आहे. या निवडणुकीत २१ उमेदवार रिंगणात आहेत.
आज २६ जून रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपल्याशी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान नोंदवावे, असे आवाहन सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त निलेश सागर यांनी केले आहे.
या निवडणूकीत सर्व मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची सरमिसळ करुन मतमोजणी केली जाते, त्यामुळे कोणत्या मतदान केंद्रात कोणत्या उमेदवारास किती मते मिळाली, असा तपशिल तयार केला जात नाही. मतदारांनी मोठया संख्येने निर्भयपणे मतदान करावे, असेही सागर यांनी सांगितले आहे.
मतदानाला हे पुरावे असणार ग्राह्य
1)आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) भारतीय पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र 10) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.