इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेली अभिनेत्री कंगना राणावतने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला. पण प्रोटोकॉलनुसार देता येत नसल्यामुळे प्रशासनाने कंगनाला स्पष्ट नकार दिला. पण, याप्रकाराची दिल्लीत जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत चिमटा काढला आहे.
खा.राऊत यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचलभवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी…
नेमकं काय घडलं
लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले सर्व खासदार अधिवेशनासाठी दिल्लीत गेले आहे. या ठिकाणी नवीन निवडून आलेल्या खासदारांना जोपर्यंत शासकीय निवासस्थान मिळत नाही. तोपर्यंत हे खासदार इतर ठिकाणी मुक्काम करणार आहेत. त्यामुळे कंगानाने सुध्दा पहिली पसंती महाराष्ट्र सदनला दिली. आज तीने महाराष्ट्र सदनमधील खोल्यांची पाहणी देखील केली. पण, येथे तीला महाराष्ट्र सदनमधील मुख्यमंत्र्यांची खोली आवडली. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या खोलीची मागणी केली. त्यामुळे काही काळ प्रशासनही गोंधळले. पण, त्यांनी नंतर स्पष्ट नकार दिला. या खोलीसाठी तिने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला महाराष्ट्र सदनमध्ये असताना कॉल केल्याचेही बोलले जात आहे. या ठिकाणी इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्र्यांच्या सुटची मागणी तीने केल्याचे समजते.