नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फळ व्यापा-याने सफरचंद खरेदी व्यवहारात तब्बल ३८ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रारंभी काही रकमेची परत फेड करीत भामट्यानी उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
शाहिद इनामदार व आझीझ इनामदार (रा.दोघे सह्याद्री हॉस्पिटलसमोर मिरजकरनगर,वडाळारोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विशाल विनायक डोईजड (रा.गजपंथ,म्हसरूळ) या फळ व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. डोईजड यांचा फळ खरेदी विक्रीचा इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. शरद पवार मार्केट मधील गाळा नं.६ मधून हा व्यवसाय ते करतात. गेल्या वर्षी १२ ऑगष्ट ते डिसेंबर २०२३ दरम्यान त्यांनी लिझीझी कंपनीच्या माध्यमातून आलेल्या सिमला अॅपलचा संशयिताना वेळोवेळी पुरवठा केला होता. प्रारंभी संशयितांनी चोख व्यवहार दाखवून ही फसवणुक केली.
पाच महिन्यांच्या कालावधीत संशयितांना ७३ लाख १६ हजार १९८ रूपये किमतीचे सफरचंदचा पुरवठा करण्यात आला. यापोटी संशयितांनी ३५ लाख ५० हजाराची परत फेड केली मात्र उर्वरीत ३७ लाख ६६ हजार १९८ रूपये देण्यास टाळाटाळ केली. सहा महिने उलटूनही संशयितांनी उधारीची परतफेड न केल्याने व्यापारी डोईजड यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.