पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवाजीनगर परिसरात एक पब पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतो व त्या अल्पवयीन पबमध्ये मुले ड्रग्सचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावर काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, शिवाजीनगर या परिसरामध्ये सर्वाधिक कॉलेज व शाळा आहेत. अशा परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, भ्रष्टाचारी राजपूत हे काय झोपा काढतात का…? तुमचा खिसा भरण्याच्या नादात आमची पोरं बरबाद होत आहेत. देसाई साहेब अजूनही तुम्हाला संधी आहे…कारवाई करा… नाहीतर या राजपूत पायी तुम्ही मंत्रीपद गमवाल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी L3 हॉटेलमधील २ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.