मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यघटना ही सर्वोच्च स्थानी असून कुणीही संविधान बदलू शकणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामजिक न्याय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. नितीन मोरे (मुंबई), ज्योती साठे, सत्यवान महाडिक (महाड), घनश्याम वाघमारे (पुणे), संतोष पवार (छत्रपती संभाजी नगर) महावीर धक्का (जालना), मनीष मेश्राम (नागपूर), फकिरा खडसे (वर्धा) तसेच देव देश प्रतिष्ठान मुंबई, भीम प्रतिष्ठान सोलापूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्यवाहक महेश पोहनेरकर, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी चव्हाण, किशोर कांबळे यांच्यासह राज्यातील १६० संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.