मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप यांनी दिला इशारा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सातत्याने गरळ ओकणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा सकल मराठा समाजाने उचलला असून या संदर्भात विशेष रणनीती आखण्याचे तसेच सूक्ष्म नियोजनाचे काम सुरू झाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार जगताप यांनी दिली.
मराठा समाजास संवैधानिक मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर राज्य सरकारातील अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ गरळ ओकू लागले. ओबीसीचा मुद्दा पुढे करून मराठा आंदोलनाला ते कडाडून विरोध करू लागले. ते येथेच थांबले नाहीत तर जरांगेचे चारित्र्यहनन करून त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिकाटिप्पणीही सुरु केली. संवैधानिक पदावर बसलेल्या मंत्र्याच्या तोंडी अशी भाषा म्हणजे एक प्रकारे तो संविधानाचा अपमानच म्हणावा लागेल. मराठा समाजास डिचवण्यासाठी ओबीसी समाजास भडकवून भुजबळ यांनी प्रति आंदोलन व मोर्चे उभे करून त्याला आर्थिक रसदही पुरवली. आता तर ओबीसी कार्यकर्त्यांना उपोषणास बसवून मोठी नाट्यमय घडामोडी घडवून आणत स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर देत राष्ट्रवादी अजित पवार गटाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
मराठ्यांना जे काही दिले ते सर्व आम्हाला द्या उपसमिती, सारथी सारखी ताकद आमच्या मागेही उभी करा. मराठयांच्या मोठ्याप्रमाणात झालेल्या कुणबी नोंदणी रद्द करून त्यांच्या मुलांचे शैक्षिणक,नोकरीतील दारे बंद करण्याची मागणीही भुजबळ यांनी केल्याने मराठा समाजातील तरुणांसह सर्वांमध्येच संतापाची. लाट उसळली आहे.भुजबळ हे मराठा समाजाचे पूर्वीपासूनच कट्टर विरोधक आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात घट्ट पाय रोवताना त्यांनी मराठा समाजाच्या अनेक बड्या नेत्यांचे खच्चीकरण केले आणि त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचे काम केले हे सर्वश्रुत आहे. माजी खासदार व मविप्रचे माजी सरचिटणीस डॉ.वसंत पवार यांनाही त्यांनी खूप त्रास दिला.परंतु डॉ.पवार त्यांना पुरून उरले.मराठा समाजाच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्था, बँका, कारखाने यांची आर्थिक घडी विस्कळीत करण्याचे कामही भुजबळ यांनी केले ही बाब लपून राहिलेली नाही. मराठा समाजाच्या नेत्यांच्या निदर्शनास या गोष्टी आल्यानंतर भुजबळ यांच्या जिल्ह्यातील राजकीय कारकीर्दीला ब्रेक लावण्याचे काम त्यांनी सुरू केले .इतके दिवस मराठा व ओबीसी समाज गळ्यात गळा घालून फिरत होते.
मात्र भुजबळ यांनी किल्ल्याच्या राजकारणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याने जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.जरांगेना टार्गेट करून भुजबळ यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. राजकीय अस्तित्व संपल्यानेच आत्ता ओबीसी नेतृत्व पुन्हा जिवंत करण्याची भुजबळ यांची धडपड सुरू झाली आहे.येवला हा आतापर्यंत त्यांचा महत्त्वाचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतुमराठ्यांचा असलेला रोष बघता ते यावेळी येवल्यातून पळ काढतील अशी चर्चा सुरू झाली आहे.परंतु त्यांनी पळपुटी भूमिका न घेता येवल्यातूच निवडणूक लढवावी आणि विजयी होऊन दाखवावेच असे सकल मराठा समाजाचे त्यांना आव्हान आहे,असेही जगताप यांनी पत्रकात नमूद केले आहे
मराठा-ओबीसी वाद हा कधी नव्हताच आणी भविष्यातही राहणार नाही. परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी भुजबळ यांनी त्या वादाला फोडणी देत या दोन्ही समाजात दुही निर्माण गलिच्छ प्रयत्न केला आहे. मराठा समाज त्यांना कधीच माफ करणार नाही. खरंतर जातीयवादी भुजबळ यांना वेळीच रोखण्याचे काम अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी. करायला हवे होते. परंतु तसे न झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळच यांच्याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही आमदार नाशिक जिल्ह्यातून निवडल जाणार नाही असा निर्धार सकल मराठा समाजाने केला असून त्या दृष्टीने रणनीती तसेच सूक्ष्म नियोजनाचे काम सुरू झाले आहे. लवकरच एकत्रित बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे तसे त्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मनोज जरांगे पाटीलही या नियोजनात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे पाटील लवकरच नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत त्याची आठवणही जगताप यांनी करून दिली. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी समन्वयक विलास पांगारकर, तुषार जगताप, सचिन पवार, विलास जाधव, सचिन शिंदे कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते.
डाव हाणून पाडला जाईल
मराठा,वंजारी,धनगर,माळी एससी,एसटी व अन्य ओबीसी कधीच एकमेकांच्या विरोधात नव्हते आणि भविष्यातही ते विरोधात राहणार नाहीत. नाशिक जिल्ह्यात सर्व समाज सतत एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदतील यात कोणतीही शंका नाही. यात दरी निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न केला तरी त्यांचा तो डाव हाणून पाडला जाईल तीळ मात्र शंका नाही
तुषार जगताप
मा. संचालक – अण्णासाहेब पाटील महामंडळ
षड्यंत्राला कुणीही बळी पडू नये
जरांगे पाटील यांची प्रकृती उत्तम आहे.त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. कुणीही कोणत्याही समाजच्या विरोधात पोस्ट,मॅसेज करून तेढ निर्माण करू नये.आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते हेतूता दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा या षड्यंत्राला कुणीही बळी पडू नये
विलास पांगारकर
समन्वयक – मराठा क्रांतो मोर्चा