पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीवरील दोघांना उडवणा-या आमदार पुतण्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला, तरी पोलिस कोठडी न मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. या घटनेत ओम सुनील भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्या मयूर मोहित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यामुळे त्याच्या जामीनचा मार्गही मोकळा झाला आहे.
एक तरुणही जखमी
आ. मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत असताना तो वेगात गाडी चालवत होता. समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारची धडक बसली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली, तर तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ओम भालेराव या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.