इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – आयकिया ही फर्निचर कंपनी जगात प्रसिद्ध आहे. या कंपनीने एका महिला ग्राहकाला कॅरिबॅगसाठी २० रुपये मागितले आणि आता असे काही झाले आहे की, कंपनीनेच महिलेला ३००० रुपये देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहक न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बंगळुरू येथे आयकिया कंपनीने ग्राहकाकडून एका कागदी पिशवीचे शुल्क आकारले. त्या पिशवीवर कंपनीचा लोगोही होता. ग्राहक संगीता बोहरा यांच्याकडून ६ ऑक्टोबर २०२२ रोजी आयकियाच्या नागासंद्र येथील ब्रांचमधून कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारण्यात आले. यानंतर महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. बोहरा यांनी दुकानातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या आणि कॅरीबॅग मागितली होती. या कॅरीबॅगसाठी कंपनीने त्याच्याकडून २० रुपये आकारले होते. हे २० रुपये आकारणे कंपनीला महागात पडले. कारण महिलेने ग्राहक न्यायालयात त्या विरोधात धाव घेतली.
बोहरा यांनी कंपनीच्या कर्मचार्यांना कंपनीचा लोगो असलेल्या कॅरीबॅगसाठी २० रुपये आकारल्याबद्दल विचारणा केली. कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे त्या कर्मचाऱ्यांना म्हणाल्या. खरेदी करण्यापूर्वी तिला या शुल्काबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. बोहरा यांनी लगेच ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिने आपल्या याचिकेत कागदी पिशव्यांसाठी शुल्क आकारणे हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने आयकियाला महिला ग्राहकाला ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
अनुचित व्यवहार
बेंगळुरू येथील शांतीनगर येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘या मोठ्या मॉल्स किंवा शोरूम्सद्वारे प्रदान केलेली सेवा पाहून आम्हाला धक्का बसला आहे. ग्राहकाने सेवेचा अभाव आणि अनुचित व्यापार पद्धतीची तक्रार केली आहे. तक्रारदाराला नुकसान भरपाई मिळावी.’ ग्राहक तक्रार निवारण मंचाने आपल्या निर्णयात आयकिया कंपनीला चांगलेच खडसावले आहे. त्यावर आपली बाजू मांडताना आयकिया कंपनीने स्वतःच्या ब्रांडेड बॅगसाठी शुल्क आकारणे चुकीचे नसल्याचा दावा केला आहे.