पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे दुचाकी आणि कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील भालेराव याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर मोहिते असे आमदार पुतण्याचे नाव आहे. अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केले होते का, याचाही तपास पोलिस सुरू आहे. आ. मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत असताना तो वेगात गाडी चालवत होता. समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारची धडक बसली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली, तर तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ओम भालेराव या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.